• 48 तासाच्या आत खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर होणार कारवाई
हिंगोली (जिमाका), दि. 17 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्च नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता आपला होणारा दररोजचा खर्च सनियंत्रण पथकास दि. 15 एप्रिलपर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
परंतु ॲड. शिवाजीराव जाधव, विजय ज्ञानोबा राऊत, ॲड. रवी शिंदे, बाबूराव आनंदराव कदम, दत्ता श्रीकृष्ण सुर्यवंशी, आनंद राजाराम धुळे, अनिल देवराव मोहिते, श्रीमती वर्षा देवसरकर, अशो पांडूरंग राठोड, सुनिल मोतीराम गजभार या उमेदवारांनी नोंदवही व खर्चाचे प्रमाणके तपासणीसाठी दि. 15 एप्रिलपर्यंत सादर केले नाहीत. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी त्यांचा खर्च तात्काळ सादर करावा.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 77 अन्वये खर्चाचे दैनंदिन लेखे ठेवण्यात कसूर केल्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण कक्ष, जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे सादर करावे. विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास भादंवि कलम 171 (1) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.