Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. प्रभा अत्रे यांची भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, तहसिलदार राधिका बारटक्के, स्वरमयी गुरुकुलचे सदस्य यांच्यासह गायन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट शेअर करुन प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं “स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एक स्वरतपस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०२२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शास्त्रीय संगीत परंपरेच्या त्या महत्वाच्या दुवा होत्या. संगीताचा ध्यास घेऊन त्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.“
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: