९ जून रोजी झालेल्या दोन बैल चोरीचा तपास अजूनही लागेना!
प्रतिनिधी – उमेश चक्कर, हिंगोली
औंढा नागनाथ तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील शिरडशहापूर येथे 4 जुलै च्या मध्यरात्रीच्या सुमारास बसस्थानक रोडवरील शिवसाई किराणा दुकानात दुकानच्या पाठीमागील असलेल्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यामध्ये तेलाचे डबे, सह इतर सामान असा 40 ते 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेल्याची माहिती दुकानचे मालक शिवचरण वाघे यांनी दिली.
त्यानंतर लक्ष्मीबाई देवजी लुटे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात कोणीच नसल्याचे माहिती असतांना चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर अलमारीतील सामान वास्तव्यस्त फेकून साड्या तथा घरातील टीव्ही व घरातील किराणा सामान चोरून नेल्याची माहिती देखील लक्ष्मीबाई लुटे यांनी यावेळी दिली. त्यानंतर लगतच असलेल्या लक्ष्मीबाई भगवान जोगदंड यांच्या घरी ज्या खोलीत घरचे झोपलेले असताना बाहेरून चोरट्यांनी कडी लावून घेतली त्यानंतर बाजूच्या घरातील साड्या, टीव्ही तथा घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यासह घरातील किराणा सामान नेल्याची माहिती देखील जोगदंड यांनी दिली. लगतच असलेल्या श्री शांती विद्यामंदिर समोरील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे दिसत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले त्यानंतर मुंजाप्पा विश्वनाथ हडपकर यांच्या घरी कोणी रहात नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप, कोंडा कट्टरच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. तिथे चोरट्यांच्या हाताला काही लागले नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
परंतु घरामध्ये एक लाख रुपयाच्या वर किराणा सामान असतांना बोळीत घर असल्याने गाडी तेथे जाऊ शकली नसल्याने कुठल्याही प्रकारची चोरी चोरट्यांना करता आली नसल्याची माहिती देखील हडपकर यांनी दिली. या अगोदर 9 जून रोजी गजानन जोगदंड पाटील यांचे तीन बैल चोरीला गेल्याची घटना घडली होती. जोगदंड यांनी कुरुंदा पोलिसात फिर्याद देखील दिली. त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र याचा तपास अजूनही लागला नसल्याची खंत गजानन जोगदंड यांनी बोलतांना व्यक्त केली. दररोज पोलिसाची गस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे. पोलिसांची गस्त नसल्याने चोरीच्या घटना घडल्याच्या चर्चा परिसरात होत आहेत. कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राम निरदोडे यांच्याशी संपर्क केला असता पंचनामा सुरू आहे घटनास्थळ पाहून पंचनामा करून तपास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.